सध्या शिक्षण व्यवस्थेमध्ये लबाड , खोटे - नाटे बोलून विद्यार्थी आणि पालक वर्गाला लुटत राहणे हा व्यापारच झाला आहे का ?
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, पण हे दूध मात्र ज्यांच्याकडे धनाचा साठा भरमसाठ आहे , आणि जो छुप्या मार्गाने शिक्षण यंत्रणेला देऊ शकतो त्यालाच हे वाघिणीचे दूध दिले जात आहे का ? असा भयानक प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे .
आज समाजामध्ये मुठभर बुद्धिजीवी लोक शिकून सवरून मोठे होत आहेत . परंतु त्यांच्यासाठी आणखीन एक परीक्षा लावली जात आहे . ती परीक्षा म्हणजे धनसंपत्ती परीक्षा !
ज्यांच्याजवळ जेवढा जास्त पैसा त्याची तेवढी जास्त गुणवत्ता ! गुणवत्तेच्या यादीत पहिल्या क्रमांकावर त्याचेच नाव छुप्या मार्गाने जो पैशाच्या गरम नोटा शिक्षण यंत्रणेला नेवून देईल .
वैद्यकीय , अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी वीस पंचवीस लाखापासून करोडो रुपये मोजावे लागतात . जर विचार केला तर खरंच एका विद्यार्थ्यामागे करोडो रुपये खर्च शिक्षण व्यवस्था करते का ? शिक्षण व्यवस्थेने यावर कधी आत्मपरीक्षण केलं आहे का ? अशी लाखो करोडो रुपये भरण्याइतपत सर्वसाधारण लोकांची मजल कशी पोहोचेल !
ज्यांच्याकडे भरपूर छुप्या मार्गाने पैसे येतात ते लोक शिक्षण यंत्रणेला छुप्या मार्गाने पैसे देऊन आपल्या मुलांना डॉक्टर इंजिनियर करू शकतात . परंतु सर्वसामान्य लोकांनी एवढा भरमसाठ पैसा आणायचा कुठून ?
* पदवीधारकांना परावलंबी बनवणारी शिक्षण व्यवस्था असेच म्हणावे लागेल.*
मुले जेव्हा लहान असतात तेव्हा प्रत्येक आई - वडिलांना वाटते माझा मुलगा डॉक्टर , इंजिनिअर व्हावा , परंतु जेव्हा प्रत्यक्ष प्रवेश घ्यायची वेळ येते तेव्हा मुलांच्या आणि आई-वडिलांच्या स्वप्नांवर पाणी फिरते . पावलोपावली उराशी बाळगलेले डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न क्षणात विसरून जावं लागते. त्याची जर कारण शोधले तर तो आहे फक्त आणि फक्त भरमसाठ पैसा ! ज्यांच्याजवळ करोडो रुपये शिक्षण यंत्रणेला छुप्या मार्गाने देण्यासाठी आहेत त्यांच्या मुलांना कुठलीच गुणवत्ता लागत नाही . आणि ज्यांच्या मुलांकडे गुणवत्तेची माळ आहे . पण त्यांच्या आई - वडिलांकडे पैसा नाही म्हणून त्या मुलांना आपले स्वप्न विसरून जावं लागत आहे . सर्वसाधारण लोकापैकी एखाद्या गावात कोणी प्रयत्न केलाच आपल्या मुलांना मोठा डॉक्टर इंजिनिअर बनवायचं तर त्यांचे घर - दार , शेती , भांडवल घरातले दाग दागिने सर्वच गहाण ठेवावे लागत आहे . मुलांच्या शिक्षणापाई अनेक पालकांच्या जमिनी कायमच्या गेल्या शिक्षण व्यवस्थेने उच्चशिक्षितांना भाकरी नाहीच दिल्या पण आई-वडिलांच्या हाताच्या भाकरी जमिनीच्या रूपाने हिसकावून घेतल्या . उच्च शिक्षण असलेले गुणवत्ता साधी भाजी भाकरी ही कमवू शकत नाही , जी शैक्षणिक पदवी साधी भाजी भाकरी ही कमवू शकत नाही ती पदवी काय कामाची ? म्हणून पदवीधारकांना परावलंबी बनवणारी शिक्षण व्यवस्था असेच म्हणावे लागेल .
*भ्रष्ट कामे करायला लावणारी शिक्षण व्यवस्था *
उच्च पदवीधारकांना तर पैसा फेकावच लागत आहे , परंतु आज-काल लहान - लहान कवळ्या मुलांना , कवळ्या कळ्यांना कळ्या फुलांना इंग्लिश स्कूलच्या नावाखाली पन्नास - पन्नास हजार रुपये मोजावी लागत आहेत . लहानपणापासूनच एवढा पैसा शाळा जर घेत असतील तर मोठेपणी त्याच मुलांना किती खर्च येत असेल . जर शैक्षणिक खर्चानेच पालकांचे कंबरडे मोडत असेल तर मुला मुलींच्या लग्नविवाहाचे बजेट कुणाकडे मागायचे हाही मोठा प्रश्न पालकांसमोर आहे .
एवढा पैसा सर्वसाधारण पालक कसे कमवणार आणि जे कमावतील त्यांना भ्रष्ट मार्ग स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही . याचाच अर्थ पापी आणि भ्रष्ट कामे करायला भाग पाडणारी शिक्षण व्यवस्था !
शाळा महाविद्यालयत प्रवेशाच्या वेळी पैसा ओता , पुन्हा परीक्षेच्या वेळी वेगळी फीस आणि निकाल बदलून देण्यासाठी आणखीन चोरून पैसे भरा म्हणजेच अतिशय लुटारूपणाचा कळस गाठणारी शिक्षण व्यवस्था !
* लाचलूचपत घेऊन नौकरी विकणारी शिक्षण व्यवस्था *
अलीकडे शिक्षण व्यवस्थेने गुणवंत विद्यार्थ्यांची तर काही किंमतच ठेवली नाही , आणि या शिक्षण यंत्रणेला गुणवंताच्या जीवनाची काही दया माया पण नाही . नौकर भरती मध्ये लाखो रुपये घेऊन नौकरी विकणे हाच व्यापार सध्या जोरात सुरू आहे. शिक्षक , तलाठी ,ग्रामसेवक , जिल्हा परिषद , पंचायत समिती , अंगणवाड्या मधील सर्वच पदांसाठीच्या नौकऱ्या सर्रास विकल्या जात आहेत , हे भयान वास्तव आहे .
शिक्षकांसारखे पवित्र पद या शिक्षण यंत्रणेने भ्रष्ट केले आहे , पूर्वी गुणवत्तेच्या आधारावर महाविद्यालयातून सर्व शिक्षक परीक्षकांच्या निरीक्षणाखाली सरळ सरळ शिक्षक भरती व्हायची ते शिक्षक अतिशय प्रामाणिक अभ्यास केलेले गुणवंत विद्यार्थी असायचे . ते शिक्षक आजही इमानदारीने काम करतात . परंतु अशा सरळ सरळ भरतीमुळे शिक्षण यंत्रणेच्या घशात काहीही पडत नव्हते , लाचलूचपतीच्या पैशा वाचून शिक्षण यंत्रणेचा घसा कोरडा पडत होता. म्हणून शिक्षण यंत्रणेने अभ्यास करून नौकर्या विकायला सुरुवात केली , या भ्रष्ट यंत्रणेने जिल्हा परिषद शिक्षकांच्या सरकारी नौकर्या सुद्धा दहा - पंधरा - वीस लाखापर्यंत विकल्या !
या भ्रष्ट यंत्रणेने जेव्हापासून नौकर्या विकायला सुरुवात केली , तेव्हा शिक्षणामधून सेवावृत्ती , निर्व्यसनीपणा , चरित्रे , बुद्धिमत्ता , सत्वगुण , देशभक्ती , स्वावलंबन हे सर्व वजा झाले आहे .
साधी सरळ गोष्ट आहे पंधरा-वीस लाख रुपये भरून शिक्षक बनलेल्या व्यक्तीची मानसिकता विद्यार्थ्यांची सेवा करण्याची राहील का ? तो शिक्षक फक्त पैसे वसूल करण्याचेच बघेल , लाखो करोडो रुपये खर्च करून डॉक्टर बनलेल्या व्यक्तीची मानसिकता समाजाला निरोगी सुदृढ बनवणारी राहील का ? या उलट समाजाला लुटून आपला पैसा वसूल कसं होईल याचेच तो बघेल , दहा-बारा लाख रुपये लाच लाचलूचपत देऊन बनलेला ग्रामसेवक गावाची सेवा करेल का ? शेवटी गावकऱ्याकडूनच जास्तीत जास्त लाच कशी घेता येईल आणि आपला पैसा वसूल कसा होईल असेच तो ग्रामसेवक बघेल ! कारण यांना यंत्रणेने लुटले म्हणून हे लोक समाजाला लुटणार , असे चित्र पाहिले आणि अनुभवल्यानंतर समाजातील जनमानसाच्या तोंडून सहज उदगार निघतात लबाड आणि लुटारू शिक्षण व्यवस्था .
हे भयान वास्तव गेले कित्येक वर्षापासून आजतागायत आपण सतत अनुभवत आहोत , या भयान वास्तवतेला आणि गुणवंतावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे हे तुमचे आमचे सर्वांचे काम आहेत , चला तर मग नक्कीच आपले कर्तव्य ओळखू या आणि या भ्रष्ट लुटारू यंत्रणेला प्रामाणिकतेचा धडा शिकूया !
आपले मत खालील कमेंट मध्ये नोंदवा !
किंवा
टिपणी प्रविष्ट करा |
लेखक - सौ . गायत्री अमोल बिरादार

Vastav
उत्तर द्याहटवाअतिशय सत्य परिस्थिती वर्णन केली
उत्तर द्याहटवाReality
उत्तर द्याहटवाअतिशय उत्क्रष्ट लेख खूप सुंदर
उत्तर द्याहटवा